मदर वेलंकनी इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, तसेच आशादीप अध्यापक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ जानेवारी रोजी ‘पत्रकार दिन’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मराठी पत्रकारितेचे जनक स्व. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मान्यवर पाहुणे, ज्येष्ठ पत्रकार, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सूत्रसंचालकांच्या प्रास्ताविकाने झाली. उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार, शिक्षक व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. ‘वृत्तपत्र म्हणजे जगाचा आरसा, उद्याचा इतिहास व लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ’ या विचारातून पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
त्यानंतर मान्यवर पाहुण्यांचे स्वागत तिलक व बॅच लावून करण्यात आले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर वातावरण प्रसन्न व मंगलमय झाले. यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मधुर स्वागतगीताने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली.
कार्यक्रमात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. शशिकांत सावंत (निवासी संपादक – दैनिक पुढारी) यांची ओळख करून देण्यात आली. मराठी पत्रकारितेतील त्यांचे योगदान, सामाजिक व कायदेशीर क्षेत्रातील कार्य याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. पिटर फिलिप फर्नांडिस यांचा परिचय करून देण्यात आला. उद्योग, समाजसेवा व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचा प्रेरणादायी प्रवास उपस्थितांसमोर मांडण्यात आला.
संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्ष मा. आशा डिसूजा मॅडम, मदर वेलंकनी एज्युकेशन ट्रस्टचे सचिव मा. श्री. दीप गॅब्रिएल मुरझेलो, तसेच प्रमुख अतिथी मा. श्री. अनिलराज रामदास रोकडे (ज्येष्ठ पत्रकार) यांचीही ओळख करून देत त्यांचे स्वागत करण्यात आले.
यानंतर विविध मान्यवर पदाधिकारी व ज्येष्ठ पत्रकारांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यात खजिनदार, सचिव, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सहसचिव, कार्यालय प्रमुख तसेच ज्येष्ठ पत्रकारांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली. सर्वप्रथम मा. आशा डिसूजा मॅडम यांनी पत्रकार दिनानिमित्त आपले विचार व्यक्त करत शिक्षण व पत्रकारिता यांचे समाजातील महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर मा. श्री. अनिलराज रोकडे यांनी निर्भीड, सत्यनिष्ठ पत्रकारितेचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाध्यक्ष मा. श्री. शशिकांत सावंत यांनी आपल्या अनुभवातून पत्रकारितेतील जबाबदारी व मूल्याधिष्ठित दृष्टिकोन यावर प्रकाश टाकला. प्रमुख पाहुणे मा. श्री. पिटर फिलिप फर्नांडिस यांनी प्रेरणादायी विचार मांडत कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा व सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मा. श्री. दीप गॅब्रिएल मुरझेलो यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे, पत्रकार बंधु-भगिनी, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. एकूणच पत्रकार दिनाचा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी, विचारप्रवर्तक व यशस्वी ठरला.





































Leave a Reply